नवरदेव मद्यधुंद अवस्थेत, बरेलीत लग्नाचा पार विचका

खुद्द नवरदेव मद्यधुंद अवस्थेत आल्याने बरेलीत एका लग्नाचा पार विचका झाला. मदिरादेवी नवरदेवावर इतकी प्रसन्न झाली होती की, वराने वधूऐवजी तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात वरमाला घातली. त्यामुळे चिडलेल्या राधाबाई या वधूने रागावून वराच्या कानशिलात आवाज काढत थेट लग्नच मोडले, परंतु हा ड्रामा इथेच संपला नाही. या नाट्याची सुरुवात नवरदेव रवींद्र कुमार याच्या लेटमार्कने झाली. त्यामुळे लग्नाच्या वरातीला उशीर झाला. त्यानंतर नवऱ्याकडील मंडळींनी नवरीच्या कुटुंबीयांकडे अधिकचा हुंडा मागितला. आपण विवाहपूर्व विधींकरिता 2.5 लाख आधीच खर्च केले होते. शिवाय लग्नाच्या दिवशी सकाळी दोन लाख दिले. तरीही नवऱ्याकडून अधिकच्या रकमेची मागणी झाल्याचे वधूच्या पित्याने एफआयआरमध्ये सांगितले.

या नाटय़ाला दुसरीही बाजू आहे. रवींद्र कुमारला त्याच्या पसंतीच्या अन्य मुलीशी लग्न करायचे होते म्हणून तो लग्न मंडपात दारू पिऊन आला आणि त्याने तमाशा केला म्हणे! वधू निघून गेल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नवरदेवाला वरातीसह परत पाठवण्यात आले. हुंड्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वराला आणि मित्रांना ताब्यात घेतले. शिवाय वधूच्या कुटुंबाचा अपमान आणि ‘शांतता भंग’ केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. यात वराला दारू विकणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.