भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांनी शेकडो हेक्टरवरील खारफुटीची कत्तल करत उरण आणि पनवेल परिसरातील खाड्या बुजवल्या आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीची हरित लवादाने गंभीर दाखल घेतली असून बुजवलेल्या खाड्या तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेश सरकारला दिले आहेत. तसेच रायगड जिल्हाधिकारी, वनविभाग आणि मॅन्ग्रोज सेलच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावत एका महिन्यात कारवाईचा अहवाल सादर करण्यास बजावले आहे. त्यामुळे खाड्यांमध्ये बिनबोभाट धुडगूस घालणाऱ्या भूमाफियांबरोबरच दोषी अधिकारीही कारवाईच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
उरण-पनवेल परिसरातील गव्हाण, धुतुम, केगाव या ठिकाणचा समुद्रकिनारा व खाडीत अवैधरित्या दगडमातीचा भराव टाकून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आला आहे. तसेच मॅन्ग्रोज नष्ट करून रसायनमिश्रित दूषित पाणी खुलेआम सोडण्यात येत असल्याने संपूर्ण खाडी काळी-निळी आणि विषारी झाली आहे. त्यामुळे मॅन्ग्रोजच्या जंगलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचा जबरदस्त फटका मासेमारी व जैवविविधतेलाही बसला आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत पर्यावरणवादी संघटना व महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दाखल घेत हरित लवादाने भराव केलेल्या खाड्यांच्या जागा तत्काळ ताब्यात घेण्यात याव्यात. तसेच रसायनमिश्रित दूषित पाणी समुद्रात सोडणाऱ्या गुन्हेगार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नंदकुमार पवार यांनी ही याचिका दाखल केली होती.
विषारी केमिकल आणि कचऱ्याचे ढीग
गव्हाणच्या हद्दीत ओएनजीसीचे मोठे गोदाम आहे. गव्हाण येथील या गोदामात मोठ्या प्रमाणावर शेकडो टन कचरा आणि विषारीयुक्त रसायनमिश्रित कचरा जमा करून ठेवण्यात येतो. न्हावा येथे ओएनजीसीच्या ऑफशोअर बेसमेंट प्लाण्टमधून येणारे विषारी रसायनमिश्रित पाणी बिनबोभाटपणे खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे खाडीत विषारी केमिकल आणि कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे.
पंचतारांकित हॉटेल कारवाईच्या कचाट्यात
केगावच्या खारखंड येथील समुद्रकिनाऱ्यावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी समुद्रात 100 मीटर अंतरापर्यंत भराव टाकून जेट्टी उभारण्यात येत आहे. हे हॉटेलदेखील आता कारवाईच्या कचाट्यात आले आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीतही खाडीत मोठ्या प्रमाणावर भराव टाकून बेकायदेशीर पार्किंग तयार करण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.