मुंबईच्या ट्रॅफिकमधून हृदय, किडनी, यकृताचा सुखद प्रवास, रुग्णांच्या जीवनदानासाठी 47 वेळा ग्रीन कॉरिडोर

रतींद्र नाईक, मुंबई

चोवीस तास जागे राहणाऱ्या मुंबईत सकाळ संध्याकाळ वाहतूककोंडी नेहमीच पाहायला मिळते. ट्रफिकमधून इच्छित स्थळी वेळेत पोहोचणे तसे कठीणच. तासन्तास ट्रफिकमध्ये अडकून रुग्ण दगावल्याच्या घटनाही काही कमी नाहीत. अशा स्थितीत तडफडणाऱ्या रुग्णांचा जीव वाचावा यासाठी वाहतूक पोलिसांनी ट्रफिक रोखून धरत 47 वेळा मुंबईत ग्रीन कॉरिडोर तयार केले आहेत. या ग्रीन कॉरिडोरमधून रुग्णवाहिकेने हृदय, किडनी, यकृतासह 44 विविध अवयव रुग्णांपर्यंत अत्यल्प वेळेत पोहोचवले असून या सेवेमुळे रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. आरटीओने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

वाढत्या प्रदूषणाप्रकरणी हायकोर्टाने स्युमोटो याचिका दाखल केली असून प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीप्रकरणी हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर आरटीओने माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात वाहतूक कारवाईसह रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचीही माहिती देण्यात आलेली आहे. रुग्णांना अनेकदा इमरजन्सीमध्ये हृदय, किडनी, यकृत, फुप्फुसे यांची आवश्यकता असते. हे अवयव एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वेळेत पोहोचवणे गरजेचे असते.

मुंबईच्या ट्रफिकमध्ये विशेषतः पिक अव्हर्समध्ये असे अवयव वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे अशक्यच असते, मात्र वाहतूक पोलीस यातून मार्ग काढत रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करतात. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना ग्रीन कॉरिडोरची आवश्यकता असते तेव्हा अवयव घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकांना काही मिनिटांतच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पोहोचता येते.

ग्रीन कॉरिडोरमधून हे अवयव पोहोचवले

हृदय             10

किडनी            1

यकृत             16

हात                4

फुप्फुस           10

स्वादुपिंड व किडनी     1

यकृत व किडनी 1

हृदय व किडनी 1

बेन हॅमरेज        1

रुग्ण                2