
डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक धोरण आणि टॅरिफ धोरणांमुळे जगभरात अस्वस्थता पसरली आहे. आता याच मुद्द्यावर कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे परिणाम जगभरात दिसत असताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅनडामधील निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर टॅरिफ वॉरचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. 28 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कार्नी यांनी हे विधान केले आहे. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी प्रांत आणि प्रदेशांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी जोर दिला आहे.
जस्टिन ट्रूडो यांच्याकडून 14 मार्च रोजी पदभार स्वीकारल्यानंतर कार्नी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, सध्याच्या टॅरिफ वॉरमुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. टॅरिफ युद्ध आणि कॅनडाबाबतचे अमेरिकेचे टॅरिफ धोरण यातून मार्ग काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ट्रूडोच्या नेतृत्वाखालील लिबरल्सच्या कारकिर्दीत दशकभराच्या कमकुवत आर्थिक कामगिरीमुळे कॅनडा अमेरिकेच्या शत्रुत्वाच्या व्यापार धोरणांना बळी पडला, असेही ते म्हणाले.
वॉशिंग्टनने आयात शुल्क काढून टाकेपर्यंत कॅनडामधील 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या आयातीवरील परस्पर शुल्क कायम राहील. डॉलर-दर-डॉलर शुल्क लादण्यात कॅनडा किती पुढे जाऊ शकतो याची मर्यादा असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर कॅनडा अमेरिकेसोबत एक नवीन आर्थिक आणि सुरक्षा संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे.