ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात

ग्रेटर नोएडामध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने एका रेस्टॉरंटमधून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. मात्र प्रत्यक्षात पार्सल आले तेव्हा ते उघडून पाहिले असता तरुणी हैराण झाली. पार्सलमध्ये व्हेज ऐवजी नॉनव्हेज बिर्याणी पाठवण्यात आली. तरुणीने तात्काळ या घटनेचा व्हिडिओ काढून रेस्टॉरंटच्या या भोंगळ कारभाराबाबत माहिती दिली.

ग्रेटर नोएडात राहणाऱ्या एका तरुणीने लखनवी कबाब पराठा रेस्टॉरंटमधून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. पार्सल आल्यानंतर तरुणीने त्यातला एक घास घेतला असता तोंडात मांसाचा तुकडा आला. यानंतर तरुणीला आपल्याला व्हेज ऐवजी नॉनव्हेज बिर्याणी आल्याचे लक्षात आले. तरुणी शाकाहारी असून ऐन नवरात्रात तिला नॉनव्हेज बिर्याणी पाठवली.

व्हिडिओ आणि पीडितेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी रेस्टॉरंट संचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.