न्यूटनच्याही आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाबद्दल उल्लेख, राजस्थानच्या राज्यपालांचं विधान

सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असे आपण लहानपणीपासून शालेय पुस्तकांमधून शिकत आलेलो आहोत. मात्र न्यूटनच्या शेकडो वर्ष आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे, असे विधान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी केले. जयपूरमधील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

प्राचीन काळापासून हिंदुस्थान ज्ञान आणि विज्ञानाचा केंद्रबिंदु राहिला आहे. नालंदासारखी विश्वविद्यालयं जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत होते. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम जगाला फार उशीरा सांगितला. हिंदुस्थानमध्ये फार पूर्वीच वेदांमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, असे हरीभाऊ बागडे म्हणाले.

हिंदुस्थानमधील दुर्मीळ आणि प्राचीन ज्ञानाला संपवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आणि 1190 च्या काळात नालंदा विश्वविद्यालयातील ग्रंथालय जाळून टाकण्यात आले. इंग्रंजांनी हिंदुस्थानवर कब्जा केला तेव्हाही त्यांनी प्राचीन ज्ञानाला दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवण्यासाठी ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, वीज, विमान यासारख्या शोधांचाही उल्लेख हिंदुस्थानच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. ऋग्वेदामध्ये याचे संदर्भ आढळतात. तसेच महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या पुस्तकातही विमानांचा उल्लेख आढळतो. 50 वर्षांपूर्वी नासाने हे पुस्तक आपल्याला मिळावे अशी मागणी करणारे पत्रही लिहिले होते.