
महाराष्ट्राची मातृभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी अभिजात मराठीची दैनंदिन व्यवहारातील मोडतोड अद्याप थांबलेली नाही. मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या तसेच मेट्रोच्या गाड्यांमध्ये मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका ‘जैसे थे’ आहेत. त्या चुका सुधारण्यात प्रशासन उदासीन असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कित्येक दशके मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी मराठीत सूचना लिहिलेल्या असतात. यातील बहुतांश सूचनांमध्ये अशुद्ध मराठी आहे. मराठी व्याकरणाच्या अनेक चुका प्रवाशांच्या निदर्शनास येतात. प्रवासी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करतात. महिनाभरापूर्वी ‘सुराज्य अभियान’ या संस्थेतर्फे अॅड. सुरभी सावंत, अॅड. प्रथमेश गायकवाड, राहुल पाटकर, सुभाष अहिर, निखिल दाते, प्रसाद मानकर या मराठी भाषाप्रेमींनी बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. बेस्टचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीनिवास राव यांना तसे लेखी निवेदन देण्यात आले. मात्र अद्याप बेस्टच्या बसगाड्यांमध्ये सुधारित सूचना लावण्यात प्रशासन यशस्वी ठरलेले नाही.
स्वल्पविराम, पूर्णविरामचाही घोळ
बेस्ट बसमधील सूचना फलकांवर ‘पोलिसानां’, ‘न्यावि’, ‘प्रवाश्यांनी’ अशा अनेक अशुद्ध शब्दांचा वापर केला आहे. मुंबई मेट्रोमध्येही अशुद्ध मराठीचा वापर दिसून येत आहे. मेट्रो गाड्यांच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध मराठीमध्ये सूचना लावल्या आहेत. त्यात ‘दरवाज्याला टेकुन उभे राहु नये’, ‘दरवाज्याच्या प्रचालनात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणे धोकादायक आणि दंडनीय आहे’ अशा गंभीर चुका निदर्शनास येत आहेत.
बसमधील सूचना फलकांवर जे अशुद्ध मराठी शब्द आहेत, त्या ठिकाणी लवकरच दुरुस्ती केली जाईल. मराठी भाषाप्रेमींनी दिलेल्या निवेदनाला अनुसरून दुरुस्ती केली जात आहे, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांनी सांगितले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दैनंदिन जीवनात या भाषेचा स्तर उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत ही मराठी भाषाप्रेमींची माफक अपेक्षा असताना सरकारी यंत्रणांना मराठी व्याकरणाच्या चुकांचे गांभीर्य कळत नसेल तर दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रया मराठी भाषातज्ञ अनिरुद्ध गर्गे यांनी दिली.