कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणात कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या पुरवणी जबाबाची चौकशी करण्यात आली असल्याचे स्पष्ट करत एटीएसने याचा सीलबंद अहवाल गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केला. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर हा अहवाल सादर करण्यात आला. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली. या प्रकरणात केवळ दोन आरोपी फरार असून अजून काही शिल्लक राहिलेले नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. कुटुंबियांच्या पुरवणी जबाबानुसार तपास करण्यात आला आहे. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याचे कलम आरोपींवर लावता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अजून पुढे काय करता येईल, असा मुद्दा असल्याचे खंडपीठाने नमूद केले. यावर बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती पानसरे कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी 2 डिसेंबर 2014पर्यंत तहकूब केली.