पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दहा वर्षे झाली. मात्र ग्रामीण, दुर्गम, आदिवासीबहुल भाग असलेल्या या जिल्ह्यातील रुग्णांना अद्याप हक्काचे शासकीय रुग्णालय मिळालेले नाही. केंद्र आणि राज्य सरकारने निधी अडकवल्यामुळे पालघरमधील सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सेंटर व्हेंटिलेटरवर गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हॉस्पिटलचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगडमधील रुग्णांची फरफट होत असून त्यांना ठाणे, नाशिक, मुंबई आणि गुजरात येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
2018 मध्ये मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र सहा वर्षे उलटूनही या इमारतीचे काम 90 टक्केच पूर्ण झाले आहे. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी वैतरणा नदीच्या पात्रातून पाणी आणण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी अजूनही सुमारे साडेचार किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम प्रलंबित आहे. या प्रकल्पातील ३७ कोटी रुपये प्रलंबित असल्याने ते काम रखडले आहे. 2022 मध्ये 200 खाटांच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीच्या उभारणीचे काम सुरू झाले. या इमारतीचे काम आता 73 टक्के पूर्ण झाले आहे. 209 कोटींची तरतूद करून उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलसाठी 148 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. मात्र केंद्र सरकारकडून जवळपास 150 कोटी रुपये 2024 मध्ये राज्य सरकारला देण्यात आले. मात्र निधी उपलब्ध होऊनदेखील निधी देण्यात आला नसल्याने सिव्हिल रुग्णालयाचे काम रखडल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले आहे.
निविदा प्रक्रिया राबवली
ट्रॉमा केअर सेंटरला केंद्र सरकारकडून 37 लाखांचा निधी रखडल्याने जलवाहिनीच्या कामांसह इतर कामे खोळंबली आहेत. तेथील ऑपरेशन थिएटर, वैद्यकीय उपकरणे, खाटा व इतर रुग्णालयातील साहित्य विकत घेण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.