मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेवर महायुती सरकार मेहरबान झाले आहे. शासकीय कर्मचाऱयांचे वेतन आणि भत्ते जमा करण्यासाठी मुंबै बँकेत खाती उघडण्यास सरकारने आज मंजुरी दिली. महामंडळे आणि सरकारी उपक्रमांमधील अतिरिक्त निधीही मुंबै बँकेत गुंतवता यावा म्हणून निकष शिथिल करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2024-2025 या वर्षाकरिता हा निर्णय असला तरी तो पुढे कायम केला जाईल असे सांगण्यात येते. त्यामुळे या वर्षी शासकीय कर्मचाऱयांना त्यांचे वेतन आणि भत्ते मुंबै बँकेमार्फत मिळणार आहेत. शासकीय कर्मचाऱयांची संख्या सुमारे साडेसतरा लाख इतकी आहे.
पेन्शनर्सचीही खाती उघडली जाणार
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांबरोबरच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाती उघडण्याकरिताही मुंबै बँकेला प्राधिकृत करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.