शिवशाही बससेवा बंद करण्याचा सरकारचा घाट; सामान्यांचा एसटीचा गारेगार प्रवास थांबणार!

तत्कालीन युती सरकारमधील परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्वसामान्यांना वातानुकुलीत बसेसचा प्रवास करता यावा, यासाठी खास सुरू केलेली शिवशाही बससेवा बंद करण्याचा घाट महामंडळाने घातला आहे. यामुळे सर्वसामान्यांच एसटीचा गारेगार प्रवास थांबणार आहे. उद्या 28 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवनेरी बसेस दाखल झाल्यानंतर प्रवाशांसाठी वातानुकूलीत प्रवास सुरु झाला होता, मात्र या शिवनेरीचे प्रवास भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने त्यांचा प्रवास घामाघूम होत लाल डब्ब्यातूनच सुरु होता. दरम्यान, 1914 साली शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आले आणि दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन खात्याची जवाबदारी देण्यात आली. त्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेत असलेल्या शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात या वसमधून वातानुकुलीत प्रवास करता यावा, हा या मागील उद्देश होता. सुरुवातीला भाडेतत्त्वावर आणि त्यानंतर महामंडळाच्या मालकीच्या शिवशाही बसेस 2017 साली ऑगस्ट महिन्यापासून प्रवासी सेवेत दाखल झाल्या. सरकारने मध्यमवर्गीयांसाठी सुरु केलेल्या या बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, सत्तांतरानंतर दिवाकर रावते यांची मंत्री पद गेल्यानंतर या शिवशाही बससेवेला घरघर लागली. महामंडळातील आगारामध्ये वेळेत आणि योग्य देखभाल होत नसल्याने मध्यमवर्गीयांसाठी गारेगार प्रवास देणारी शिवशाही बसेसला कळा आली. महामंडळाच्या यांत्रिकी विभागाला शिवशाहीच्या वातानुकुलीत यंत्रणेची समजच न आल्याने कालांतराने अनेक बसेसमध्ये वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. तुटलेले आसन, खिडक्यांचे फाटलेले आणि मळकट पडदे आणि खडखडाट करीत होणारा प्रवास यामुळे प्रवाशीही वैतागले होते. त्यामुळे भाडेतत्त्वावरील शिवशाही बसेस बंद करण्यात आल्या होत्या, मात्र महामंडळाच्या मालकीच्या 892 बसेस मात्र प्रवासी सेवेत होत्या. वारंवार वातानुकुलीत यंत्रणा बंद पडू लागल्याने त्याचे कारण उशीराने तांत्रिक विभागाला कळले. शिवशाहीच्या इंजिनची ताकद 180 अश्वशक्ति होती आणि त्यावर वातानुकुलीत यंत्रणेचा 38 किलो वॅटचा दाब होता. त्यामुळे यात वारंवार दोष येत होते. त्यातुन अनेक शिवशाही प्रवासात असतांना बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या. बावर उपाय करण्याऐवजी सध्याच्या सरकारने शिवशाही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली, उद्या 28 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यताही सुत्रांनी व्यक्त केली. हा निर्णय झाल्यास महामंडळाची शान समजल्या जाणाऱ्या शिवशाही बसेस इतिहास जमा होणार आहे.