बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख व परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून विरोधक रोजच सरकारला धारेवर धरत आहेत. या रागातून सत्ताधारी आता पोलिसांना विरोधकांच्या घरात घुसवून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. आज तर अक्षरशः कहर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलीस त्यांच्या घरात घुसले आणि थेट शूटिंग सुरू केले. त्यावर आव्हाड प्रचंड संतापले आहेत. विरोधकांवर वॉच ठेवण्याऐवजी हिंमत असल्यास पोलिसांनी वाल्मीक कराडवर वॉच ठेवावा, अशा शब्दांत त्यांनी खरडपट्टी काढली.
बीड आणि परभणी प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण तंग आहे.या दोन्ही मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आव्हाड यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ नोंद न करता ठाण्यातील एसबीच्या पोलिसांनी थेट घरात शिरकाव केला. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचे चित्रीकरण केले.
आमच्या घरावर वॉच कशासाठी?
फडणवीस सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांवर का वॉच ठेवत आहेत, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे, असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मीक कराडवर वॉच ठेवावा असा टोलादेखील त्यांनी लगावला.