आधीच नोकऱ्या नाहीत, रोहित पवार यांचा AI वरून सरकारला इशारा

AI मुळे नोकऱ्या जातील, यावर शासनाने धोरण आखायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आधीच नोकऱ्या कमी आहेत त्यात आहे त्या नोकऱ्या गेल्या तर राज्यातील तरुणांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, Open AI चे CEO Sam Altman यांनी एका मुलाखतीत अनेक कंपन्यांमध्ये AI तंत्रज्ञान सध्या तब्बल 50% Coding चं काम करत असल्याचं सांगत तरुणांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअर विचार करून निवडण्याचा देखील सल्ला दिला. त्याचबरोबर AI शी निगडित शिक्षणावर भर देणारेच जॉब मार्केटमध्ये टिकून राहतील, असंही म्हणलयं. राज्यात AI तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात चर्चा वाढत असताना त्यासोबत येणाऱ्या आव्हानांच्या बाबतीतही आम्ही वेळोवेळी सरकारला अवगत करत आलो आहे. त्यामुळं राज्य शासनानेही या सर्व गोष्टीं विचारात घेऊन धोरण आखणं गरजेचं आहे. आधीच नोकऱ्या नाहीत त्यात आहे त्या नोकऱ्या जाणार असतील तर राज्यातील तरुणांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही रोहित पवार म्हणाले.