
नगर महापालिका आयुक्त पंकज जावळे व लिपिक यांच्यावर दाखल झालेल्या गुह्यासंदर्भात आज सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये लेखी म्हणणे सादर करण्यात आले असून, उद्या (दि. 9) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मागील महिन्यामध्ये महापालिका आयुक्त पंकज जावळे व लिपिक देशपांडे यांच्यावर आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार आहेत.
प्रथम डॉ. जावळे यांच्यामार्फत गेल्या आठवडय़ात ऍड. सतीश गुगळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यांनी अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले. तर, फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडून काही पुरावेसुद्धा सादर केले होते. मागील आठवडय़ात न्यायालयाने सरकारी पक्षाला लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ. म. घोडके यांनी लेखी म्हणणे सादर केले.
यामध्ये जावळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला त्यांनी विरोध केला आहे. तसेच प्रत्येक घटनेमध्ये हे कसे जबाबदार आहेत किंवा यांच्यासमवेत कोण-कोण आहेत, हे नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी उद्या (दि. 9) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.