मिंधे सरकारच्या राजवटीत सरकारी रुग्णालयांतील निष्णात डॉक्टरांवर क्लर्कचे काम करण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयांतील ऑनलाईन यंत्रणा गेली दोन वर्षे ठप्प पडल्याने डॉक्टरांवर खर्डेघाशीचे काम येऊन पडले आहे. त्याचा त्रास गरीब रुग्णांना होत असून त्यांना रांगेत तासन्तास ताटकळत रहावे लागत आहे.
रुग्णांची नोंदणी तत्परतेने व्हावी, त्यांचे तपासणी अहवाल आणि वैद्यकीय इतिहास एका क्लिकवर सर्वच विभागातील डॉक्टरांना उपलब्ध व्हावा, त्यानुसार उपचारांमध्ये अचूकता यावी तसेच रुग्णांना रांगेत ताटकळत रहावे लागू नये या उद्देशानेच राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये ऑनलाईन हेल्थ केअर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (एचएमआयएस) सुरू करण्यात आली होती. या यंत्रणेमुळे रुग्णांना चाचणी अहवाल सर्वत्र नाचवत बसण्याची गरज नव्हती. त्यांच्या नोंदणी क्रमांकावरून सर्व रेकॉर्ड डॉक्टरांना ऑनलाईन उपलब्ध व्हायचे. ही एचएमआयएस प्रणालीच अनेक महिने बंद पडल्याने डॉक्टरांवर लेखी कामाचा बोजा पडला आहे.
एचएमआयएस सेवा देणाऱ्या कंपनीसोबत पैशाच्या वादामुळे गेल्या ही प्रणाली 2023 पासून बंद होती. राज्य सरकारने जुलै 2023 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यासाठी 269 कोटींची तरतूद केली. ते काम खासगी कंपनीऐवजी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) या सरकारी संस्थेला देण्यात आले, मात्र त्यालाही बरेच महिने उलटल्यानंतरही अद्याप ती यंत्रणा सुरू झालेली नाही.
शिपाईही बनले कारकून
ओपीडीमध्ये रुग्णांची नोंदणी लवकर करता यावी म्हणून आमच्या विभागातील शिपायांना तिथे पाठवावे लागत असल्याचे विभागप्रमुख डॉक्टर सांगतात. डिजिटल इंडिया संगणकावरून पुन्हा कागदांकडे वळतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.