दिल्लीतील सरकार फार काळ टिकणार नाही; कोलकात्यात अखिलेश यादव यांचे भाकीत

दिल्लीतील केंद्र सरकार लवकरच पडेल, असे भाकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी येथे केले. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या स्थापनेपासूनच हे सरकार टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही अखिलेश यांच्याशी सहमती दर्शवली.

तृणमूल काँग्रेसने शहीद दिनानिमित्त येथे आयोजित केलेल्या शहीद रॅलीमध्ये अखिलेश यादव सहभागी झाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 21 जुलै 1993 रोजी कोलकातामध्ये फोटोसह मतदार ओळखपत्राच्या मागणीसाठी निदर्शने झाली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काँग्रेसचे 13 कार्यकर्ते ठार झाले होते. तेव्हापासून ममता बॅनर्जी दरवर्षी शहीद दिन साजरा करतात.  ममता त्या वेळी काँग्रेसच्या युवा शाखेच्या अध्यक्षा होत्या आणि बंगालमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची सत्ता होती.

पश्चिम बंगालमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत सरशी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेली ही पहिलीच मोठी रॅली होती. लाखो कार्यकर्ते, कामगार यात सहभागी झाले होते.

अखिलेश आणि ममता यांचे राजकीय समीकरण

शहीद रॅलीत सहभागी होण्यासाठी सपाप्रमुख अखिलेश यादव सकाळी कोलकातामध्ये आले. दोघांच्याही एका व्यासपीठावर एकत्र येण्यामुळे इंडिया आघाडीतील मतभेद मिटल्याचे संकेत मिळाले आहेत. अखिलेश यांनी उत्तर प्रदेशमधील भदोही लोकसभा मतदारसंघ टीएमसीसाठी सोडला होता. मात्र येथे पक्षाचा पराभव झाला. उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत ममता यांनी अखिलेश यांच्यासाठी प्रचार केला होता.

ममता बॅनर्जी सहमत

रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यांचे आभार मानले. उत्तर प्रदेशात तुम्ही दाखवलेल्या खेळामुळे मी समाजवादी पक्षाचे अभिनंदन करू इच्छिते. एजन्सी नेमून आणि निवडणूक आयोग नेमून जे सरकार दिल्लीत आणले गेले आहे ते स्थिर नाही. ते सरकार कधीही जाऊ शकते या तुमच्या मताशी मी सहमत आहे.

टीएमसीचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, बंगालमध्ये ज्यांनी यावेळी 200 चा आकडा पार करणार असल्याचे सांगितले होते त्यांना जनतेने आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी 70 वर रोखले आहे.

काय म्हणाले अखिलेश

देशातील राजकारणाकडे पाहिले तर जातीयवादी शक्तीचे आजचे आव्हान वाढले आहे. या जातीयवादी शक्ती षड्यंत्र रचत आहेत. जे सत्तेत आहेत आणि जे दिल्लीच्या इशाऱ्यावर वेगळे आहेत ते गोपनीयपणे वेगवेगळय़ा ठिकाणी आणि सतत कट रचत आहेत. प. बंगालमध्ये तुम्ही भाजपला मागे टाकले, उत्तर प्रदेशनेही तुमच्यासोबत भाजपला मागे टाकले. जे काही दिवस सत्तेवर आले आहेत ते काही दिवसांचे पाहुणे आहेत. दिल्ली सरकार चालणार नाही. ते सरकार पडणार आहे. एक दिवस हे सरकार पडेल त्यावेळी आपल्यासाठी समाधानाचे, आनंदाचे दिवस येतील.