राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने आझाद मैदानात करण्यात आलेल्या एक दिवसाच्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंत्री शंभुराजे देसाई यांनी आंदोलनातील शिष्टमंडळाबरोबर आंदोलन मागे घेण्याबाबत वाटाघाटी केल्या. या वाटाघाटी सफल झाल्या आहेत. सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱयांना 19 महिन्यांची फरकाच्या रकमेची आगामी अधिवेशनात तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कामगार नेते आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे सल्लागार बाबा कदम यांनी दिली.
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच वेतनवाढीबरोबर विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी आझाद मैदानात 1 जुलैला धरणे आंदोलन केले होते. याची दखल घेत ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे 19 महिन्यांच्या फरकासाठी लागणाऱया रकमेची येणाऱया अधिवेशनामध्येच तरतूद केली जाणार आहे. दरम्यान, यापुढील लढा हा वेतनश्रेणी वसुलीची अट रद्द करणे व कलम 61 दुरुस्ती करणे यासाठी महाराष्ट्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना, असा असेल यासाठी हायकोर्टामध्ये न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी आमचा सामना असेल, अशी माहिती ग्रामपंचायत कामगार सेनेचे सरचिटणीस दयानंद एरंडे यांनी दिली.