दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावली होती. त्यानंतर भाविकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता. ‘बुलडोझर अंगावर घेऊ, पण हनुमान मंदिराला हात लावू देणार नाही!’ असा एल्गार भाविकांनी जनआंदोलनाचा इशाराही दिला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे देखील आज त्या मंदिराला भेट देणार आहेत. दरम्यान शिवसेनेच्या दणक्यानंतर सरकार झुकले असून या पाडकामाला स्थगिती दिली आहे.
दादर पूर्व येथे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्र. 12 जवळील हनुमान मंदिराचे बांधकाम अनधिकृत ठरवून भाजप सरकारने त्यावर हातोडा उगारला आहे. हे बांधकाम सात दिवसांत हटवावे अन्यथा आम्ही कारवाई करून पाडकामाचा खर्चही वसूल करू, अशी मुजोर नोटीस मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहाय्यक मंडल इंजिनीयरकडून मंदिराच्या विश्वस्तांना बजावण्यात आली आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांसह सर्वच मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.