निधी पाहिजे तर भाजपात या, नितेश राणे पुन्हा बरळले; महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक रुपयाही देणार नाही

जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी हा महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल. महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही, अशी उघड धमकी मंत्री नितेश राणे यांनी दिली. निधी पाहिजे असेल तर भाजपात या, अशी ऑफरही त्यांनी दिली.

 भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बरळले. या वर्षीचा निधी संपला की, 31 मार्चनंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार. जिथे जिथे महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही, असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले.

कोणाला गावाचा विकास करायचा असेल, निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. नाहीतर गावात विकासकामे होणार नाहीत. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट आहे. आपण हातचं राखून ठेवत नाही. हे भाषण ऐकून उरलेसुरले कोण असतील तर आताच सांगा. रवींद्र चव्हाण यांची वेळ आम्ही घेतो, असे नितेश राणे म्हणाले.

आपला बॉस वरती बसला आहे

महायुतीचा झेंडा गावात दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना समज द्यावी – रोहित पवार

जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरपंच असतील त्या गावाला एक रुपयाही देणार नाही, ज्यांना निधी हवा असेल त्यांनी पक्षप्रवेश करावा, ही मंत्री महोदयांची भाषा बघता त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना शपथेचा मजकूर काळजीपूर्वक वाचलेला दिसत नाही अथवा त्यांना संवैधानिक शपथेचा विसर पडलेला दिसतो. मंत्रीच अशा प्रकारे संविधानाची चिरफाड करणार असतील तर संविधान टीकेला का? त्यांनी संवैधानिक जबाबदारी समजून घेत मंत्र्यांसारखे वागायला हवे. मुख्यमंत्री महोदय आपल्या मंत्र्यांना समाज देतील ही अपेक्षा, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांचे ‘आका’ त्यांच्यावर कारवाई करणार का? – वर्षा गायकवाड

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या आवडीचं नेतृत्व, लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. नितेश राणे यांच विधान हे संवैधानिक अधिकाराची थट्टा करणारे आहे. तुम्ही आमच्या पक्षात सामील झालात, तरच आम्ही पैसे देऊ, असलं विधान हे केवळ एक वाईट विचारसरणीचं नव्हे तर लोकांना एक प्रकारची उघड धमकी आहे. ‘मेघदूत’ बंगल्यात राहणाऱ्या त्यांच्या आकानं त्यांना हे असं विधान करण्याचे आदेश धाडले होते की काय? जर तसं नाही, तर आका त्यांच्या या मोठय़ा तोंडाच्या मंत्र्यावर काही कारवाई करणार की नाही? असा सवाल मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.