सरकार जागे झाले; शववाहिन्यांचे अखेर वाटप सुरू

‘खेकडा’ आणि ‘हापकीन फेम’ तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तब्बल 35 कोटी खर्च करून खरेदी केलेल्या नव्या शंभर शववाहिन्या तीन महिन्यांपासून नायडू रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेत धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकारावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून या धूळखात पडलेल्या शववाहिन्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

मिंधे सरकारमध्ये तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी राज्यात शववाहिका हव्या असल्याचे पत्र केंद्र सरकारला दिले होते. केंद्र सरकारनेही शववाहिन्यांसाठी 35 कोटी रुपये मंजूर केले. राज्य सरकारने शववाहिन्यांचे कंत्राट आयशर कंपनीकडे दिले होते. त्यानुसार आयशर कंपनीने शंभर अत्याधुनिक शववाहिका तयार करून राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या. मात्र, या नव्या कोऱ्या शववाहिन्या पुण्यातील नायडू रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेत तीन महिने उभ्या होत्या. या शववाहिकांचे वाटप का केले नाही?, याचे वाटप कसे व कधी होणार?, या 35 कोटी रुपयांच्या खरेदीत मोठा घोटाळा दडलेला आहे का? असा सवाल उपस्थित करत यावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर जागे झालेल्या सरकारकडून धूळखात पडलेल्या या शववाहिन्यांचे वाटप सुरू केले आहे. याठिकाणी उभ्या असलेल्या शववाहिन्यांपैकी सोळा दुर्गम आदिवासी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी चार शववाहिन्या, नागपूर जिल्ह्यासाठी पाच, वाशिमसाठी तीन तर इतर अठरा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन शववाहिन्यांचे वाटप केले जाणार आहे.