गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध होते. आता केंद्र सरकारने हे निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी देखील संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसने विरोध केला आहे.
तब्बल 58 वर्षांपूर्वी काँग्रेसने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घातली होती. ती बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यावरून काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर भाजप व संघाच्या नात्यात कटूता आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला असेल.
”फेब्रुवारी 1948 मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली. त्यानंतर चांगल्या वर्तनाच्या आश्वासनानंतर संघावर घातलेली बंदी हटवण्यात आली. त्यानंतरही संघाने नागपुरात कधीही तिरंगा फडकवला नाही. 1966 मध्ये, आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले – आणि तो योग्य निर्णय होता. निर्बंध घालण्यासाठी 1966 मध्ये अधिकृत आदेश जारी केला गेला. 4 जून 2024 नंतर स्वयंघोषित नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आणि संघाचे संबंध बिघडले. 9 जुलै 2024 रोजी, 58 वर्षांची सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी उठवण्यात आली. हे निर्बंध अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातही होती” असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.