
राज्यभरातील परिवहन विभागाच्या जमिनी अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले आहे. सद्यस्थितीत परिवहन विभागाच्या बहुतांश जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण हटवून जमिनीभोवती कुंपण भिंत तसेच जमिनीवर विभागाचा नामफलक लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी परिवहन विभागाच्या जमिनी आहेत. या जमिनींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक अधिकाऱयांनी संबंधित जमिनींचे सर्वेक्षण करावे आणि तेथील अतिक्रमणे हटवून जमिनी आपल्या ताब्यात घ्याव्यात, त्या जमिनीभोवती कुंपण भिंतीचे बांधकाम करावे तसेच विभागाचा नामफलक उभारून भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयात परिवहन विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले.
अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन
मागील दोन वर्षांपासून परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. यापुढे अधिकाऱ्यांबरोबर लिपिक पदाच्या बदल्या अॅपद्वारे केल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने अॅपमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.