
सरकारने मुंबईच्या रेडी रेकनर दरामध्ये 3.39 टक्क्यांनी वाढ करून मुंबईकरांना दणका दिला असताना आता गेल्या 10 वर्षांमध्ये मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ केली नाही, असे कारण देत मुंबईकरांच्या मालमत्ता करात 12 ते 13 टक्क्यांनी वाढ करावी, असा प्रस्ताव करनिर्धारण आणि संकलन विभागाने महापालिका आयुक्तांकडे पाठवला आहे.
मुंबईत 500 चौरस फुटांखालील घरांवर मालमत्ता कर रद्द करा, या मागणीसाठी शिवसेनेने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने मुंबईतील 500 चौरस फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर रद्द केला. मात्र, सध्या 500 चौरस फुटांवरील घरांवर रेडी रेकनरच्या हिशेबाने प्रत्येक चौरस फुटावर मालमत्ता कर आकारला जातो. यात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवला गेला आहे.
22 हजार कोटींची थकबाकी
मुंबई महापालिकेने विक्रमी वसुली केली असली तरी मुंबई महापालिकेकडे मालमत्ता करापोटी गेल्या 12 वर्षांपासून 22 हजार कोटींची थकबाकी आहे. मेट्रो, एमएमआरडीए, म्हाडा या राज्य सरकारच्या प्राधिकरणाबरोबर खासगी तसेच इतर सर्वांची थकबाकी धरून एकूण 22 हजार कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.