मध्य रेल्वेचा प्रवास गतिमान होणार; बदलापूर-कर्जत तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला मंजुरी

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. बदलापूर ते कर्जत मार्गावर तिसऱया व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. 32.460 किमी लांबीच्या ब्राऊनफिल्ड रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई कॉरिडॉरवरील वाढते स्थलांतर आणि मालवाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पाचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. याचा बदलापूर, कर्जतच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ‘पंतप्रधान गती शक्ती’ योजनेंतर्गत बदलापूर ते कर्जतदरम्यान रेल्वेच्या तिसऱया व चौथ्या मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1510 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हा प्रकल्प राबवणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रकल्पाचा निम्मा-निम्मा खर्च उचलणार आहे. सध्या बदलापूर, कर्जतला जाणाऱया रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. अतिरिक्त मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर, कर्जतच्या प्रवाशांची गैरसोय दूर होईल.