पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या स्पर्धेचा 8 सप्टेंबर रोजी शेवट झाला. या स्पर्धेत हिंदुस्थानने ऐतिहासीक कामगिरी करत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. त्यामुळे पॅरालिम्पिक स्पर्धेच्या विजेत्यांसाठी क्रीडा मंत्रालयाकडून खास बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी बक्षीस म्हणून एक ठरावीक रक्कम जाहीर केली आहे.
पॅरिस पॅरालिंम्पिकमधील पदक विजेत्यांचा सन्मानित करण्यासाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान क्रीडा मंत्री मनसुख मांडवियायांनी या पुरस्काराची घोषणा केली. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. तर रौप्यपदक विजेत्याला 50 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मिक्स सांघिक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या तिरंदाज शीतल देवीला अतिरिक्त 22.5 लाख रुपये दिले जाणार आहेत.
क्रिडा मंत्री मनसुख यांनी या कार्यक्रमात भाषण करत असताना सगळ्या खेळाडूंचे कौतुक केलं तसेच त्यांना प्रोत्साहित केलं. ‘पॅरालिम्पिक आणि पॅरा गेम्समध्ये हिंदुस्थानची सातत्याने प्रगती होत आहे. 2016 मध्ये हिंदुस्थानने चार पदके जिंकली होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थाने 19 पदके जिंकली. दरम्यान आता देखील हिंदुस्थानने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये 29 पदके जिंकली असून पदक तालिकेत हिंदुस्थान 18व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता आम्ही आमच्या खेळाडूंना अधिक सुविधा देऊ, जेणेकरून ते लॉस एंजेलिस 2028 पॅरालिम्पिक गेम्समध्ये अधिक पदके जिंकू शकतील. असे यावेळी ते म्हणाले आहेत.