भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याला वाचवण्याची सरकार आणि पोलिसांकडून पुरेपूर धडपड सुरू आहे. पाच वाहनांना उडवणाऱ्या संकेतच्या ऑडीचा वेग तपासण्यास आरटीओने नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरटीओचे पथक सोमवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त ऑडीच्या तपासणीसाठी गेले होते. परंतु त्यांच्याकडे चावी नसल्याने त्यांनी फक्त प्राथमिक तपासणी केली होती. आज आरटीओच्या पथकाने संकेतच्या ऑडीची पुन्हा तपासणी केली. मात्र अपघातावेळी ऑडीचा वेग किती होता याची तपासणी मात्र आरटीओ करणार नसल्याचे समजते. केवळ अपघातात ऑडीच्या कोणत्या भागाचे नुकसान झाले आणि ऑडीमधील काही दोषामुळे अपघात झाला का याच पद्धतीने तपासणी करण्याचे आरटीओला वरून आदेश आल्याचे सूत्रांकडून समजते.
12 हजारांची दारू ढोसली
संकेत आणि त्याच्या मित्रांनी धरमपेठेतील ला होरी बारमध्ये 12 हजार रुपयांची दारू घेतली होती असे बिल पोलिसांच्या हाती लागल्याचे उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी मटन रोस्ट, मटन करी, चिकन टिक्का, मसाला शेंगदाणे आणि तळलेले काजूगर घेतले होते असे उपायुक्त मदने यांनी सांगितले.