
>> धनाजी कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे 20 वर्षे रखडलेला सहावा खंड विद्यमान समितीने प्रकाशित केला. मात्र त्यात अनेक चुका असून अद्यापही त्या दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान खंडातील चुका दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय निकाली काढावा, असे निर्देश उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी बैठकीत दिले आहेत. तथापि अद्यापही त्यात सुधारणा झालेली नसून बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य संपदा प्रसिद्ध करण्यात दिरंगाई होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन बाबासाहेबांच्या साहित्याबाबत उदासीन असल्याचे समोर येत असल्याने आंबेडकरी अनुयायी आणि अभ्यासकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य एन.जी. कांबळे यांनी खंड क्रमांक सहामध्ये असलेल्या चुकांच्या संदर्भातील विषय उपस्थित केला. ऑफलाईन आणि ऑनलाईन होणाऱया बैठकीत कांबळे यांनी ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी प्रबंधाचा समावेश असलेल्या इंग्रजीतील सहाव्या खंडाचा अनुवाद प्रकाशित केला. मात्र प्रकाशनानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले. दिवंगत सदस्य सचिव वसंत मून आणि दिवंगत डॉ. कृष्णा कांबळे यांची नावे खंडातून वगळण्यात आल्यापासून खंडात असलेल्या चुकांसदर्भात सविस्तर निवेदन सदस्य सचिव तसेच उच्च शिक्षण संचालक यांच्यासह समितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री यांनाही सादर करण्यात आले. मात्र दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा पुढील बैठकीत हा विषय डॉ. कांबळे यांनी उपस्थित केला. त्यावेळी उच्च शिक्षण संचालकांनी घेऊन खंड सहामध्ये झालेल्या चुकांबाबत सुधारणा करण्याची सूचना केली होती. त्या वेळी चुका दुरुस्त करण्यात येतील असे उत्तर समितीकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही या चुका दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत.
दोन महिन्यांत ‘जनता’चे प्रकाशन
आगामी दोन महिन्यांत समितीकडून काही नवीन साहित्य प्रकाशित करण्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीत खंड सहामधील चुकांचा विषय आल्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांनी तत्काळ सदस्य सचिव आणि सदस्य यांची स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय निकाली काढावा, असे सुचवले. दोन महिन्यांत ‘जनता’ तसेच अनुवादित खंडाचे प्रकाशन करता येईल, असाही सूर बैठकीत उमटला. यासंदर्भात सदस्य एन.जी. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला.