
गुगल कंपनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात करणार आहे. ही कपात कंपनीच्या ग्लोबल रिस्ट्रक्चरिंग धोरणाअंतर्गत करण्यात येणार असून हिंदुस्थानातील हैदराबाद आणि बंगळुरू कार्यालयातील जाहिरात, सेल्स आणि मार्केटिंग टीममधून कर्मचारी कपात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुगलने मात्र अद्याप या कर्मचारी कपातीबाबत अधिकृत वृत्त दिले नाही. त्यामुळे कर्मचारी कपातीमध्ये किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल, याची आकडेवारी सध्या तरी समोर आली नाही.
याआधीही गुगलने प्लॅटफॉर्म्स आणि डिव्हाईस विभागातून अनेक कर्मचाऱ्यांना डच्चू दिला होता. जगभरातून करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीमुळे शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. सध्या जगभरातील टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. लेऑफ डॉट एफवायआयच्या आकडेवारीनुसार, 2025 पासून आतापर्यंत 108 कंपन्यांनी आपल्या 28 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.