गुगलची पुन्हा मोठी कर्मचारी कपात

गुगल कंपनीने पुन्हा एकदा शेकडो कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 मध्ये पुन्हा एकदा कंपनीने कर्मचारी कपात केली असून कंपनीच्या अँड्रॉईड सॉफ्टवेयर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राऊजर यांसारख्या टीममधील अनेक जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ही कर्मचारी कपात गुगलच्या वॉलंटरी बायआऊटअंतर्गत करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म आणि डिव्हाईसेज टीमला एकत्र केल्यानंतर कंपनी अधिक प्रभावीपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये क्लाऊड डिव्हिजनमधून अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते, तर 2023 मध्ये गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.