वीज वापरण्यात गुगल अन् मायक्रोसॉफ्टचा रेकॉर्ड

दोन दिग्गज टेक कंपन्यांनी असा रेकॉर्ड बनवलाय की, ज्यामुळे पर्यावरणासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या दोन कंपन्यांचे नाव गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आहे. या दोन टेक कंपन्या जेवढी वीज वापरतात, ते प्रमाण 100 देशांच्या वीज वापराहून अधिक आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टचा वीज वापर आईसलॅण्ड, घाना, डोमिनिकन रिपब्लिक यांसारख्या 100 पेक्षा जास्त देशांच्या एकूण वीज वापरापेक्षा जास्त आहे. एका अहवालानुसार, या दोन कंपन्यांनी 2023 मध्ये एकूण 24 टेरावॅट- तास (टीडब्ल्यूएस) वीज खर्च केलीय. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज वापरणे ही पर्यावरणासाठी नुकसानकारक असू शकते, असे काहींचे म्हणणे आहे.

टेक कंपन्यांच्या अनेक डेटा सेंटर्स आणि विद्युत उपकरणांना जास्त वीज लागते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. याचा परिणाम पर्यावरणावर होतो. विद्युत उपकरणांना थंड करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा उत्सर्जन वाढवते.  विजेचा वापर वाढला की, अधिक ऊर्जा निर्मितीची गरज भासते.