रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; राजस्थानमध्ये मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरले

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेसच्या 3 एसीसह तब्बल 15 डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच राजस्थानच्या अलवर शहराजवळ मालवाहू गाडीचे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले आहेत. अलवर रेल्वे स्थानकावरून रेवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरल्याने मथुरा-अलवर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही मालवाहू गाडी रुळावरून घसरली. याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि जयपूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिष गोयल घटनास्थळी दाखल झाले आहेत. घसरलेले डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. लवकरच या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मथुराकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर हा अपघात झाल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त डीग जिल्ह्यातील गोवर्धन येथे आयोजित जत्रेसाठी निघालेल्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे जत्रेसाठी चालवण्यात येणारी विशेष रेल्वेही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अलवर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, या अपघाताबाबत जयपूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिष गोयल यांनी सांगितले की, अलवरहून रेवाडीला निघालेली मालवाहू गाडी अलवर-मथुरा मार्गावरील रुळावरून घसरली. याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि तंज्ञत्रांनी घटनास्थळी धाव घेतली असून रेल्वेचे डबे रुळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. लवकरच हा मार्ग खुला होईल.