केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढ

केंद्रीय कर्मचाऱयांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱयांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचणार असून कर्मचाऱयांच्या पगारातही वाढ होणार आहे. सरकारच्या निर्णयाचा 48.66 लाख केंद्रीय कर्मचाऱयांना फायदा होणार आहे.

सरकारने निवृत्ती वेतनधारकांना डीआर म्हणजेच महागाई दिलासा देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. 1 जानेवारी 2025 पासून डीए आणि डीआर लागू होणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी केंद्रातील सरकारी कर्मचाऱयांना महागाई भत्ता दिला जातो. राहणीमानाचा खर्च वाढू लागल्यानंतर हा भत्ता दिला जातो.

6 हजार 614 कोटींचा बोजा

डीए आणि डीआर देण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 6 हजार 614.04 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांनंतर अवलंबून असलेली व्यक्ती यांना सरकारच्या निर्णयाचा लाभ होणार आहे.