नवीन वर्ष नव्या स्वप्नांच्या उमेदीसह बुधवारी 1 जानेवारी पासून सुरू होतंय. मात्र आज 31 डिसेंबर 2024 या सरत्या वर्षाला निरोप देताना हर्णे येथे सांजवेळी आकाशात केशरी आणि तपकिरी रंगाची उधळण पाहायला मिळाली.
नवा उत्साह नवी उमेद घेऊन वर्षे 2025 उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. तर अनेक कडूगोड आठवणींनी भरलेले वर्षे 2024 भुतकाळात प्रवेश करत आहे. 2024 चा साक्षीदार असलेला सूर्य नारायण 31 डिसेंबरला जगाचा निरोप घेत अस्ताला निघून गेले. दापोली तालुक्यातील हर्णे इथल्या सागर किनारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी आसमंत उजळून टाकणाऱ्या रवीला निरोप देण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली होती. मावळतीला जात असलेल्या सुर्यासोबत सरत्या वर्षाच्या आठवणी जागवत सोबतच नव्या आशा आकांक्षाची उभारी धरत यावेळी नागरिकांनी सूर्य देवाला निरोप दिला.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे जसे ताजी मासळी खरेदी करण्यासाठी सुप्रसिद्ध बंदर आहे, तसे ते पाण्यातील सूवर्ण दुर्ग किल्ला, फत्तेगड गोवा किल्ला आदी गड किल्ल्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणं असलेले एक गाव आहे. हे गाव नेहमीच गर्दीच्या वर्दळीने गजबजलेले असते. तसे 31 डिसेंबर 2024 या सरत्या वर्षाच्या सूर्यास्ताचे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांबरोबरच स्थानिक रहिवाशांनीही खुपच मोठी गर्दी केली होती, अशी माहिती प्रथमेश उर्फ बंटी बंगाल (चालक मालक, कोकण चायनीज काॅर्नर, हर्णे, ता. दापोली) यांनी दिली.