गोंदिया पावसाची मुसळधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीकेही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान पुराच्या पाण्यात दोन चिमुकले वाहून गेल्याची घटना गोंदियात उघडकीस आली आहे. गोरेगाव तालुक्यातील पोगझरा गावात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन भावंडाचा मृत्यू झाला आहे.
रुद्र सुजित दुबे आणि शिवम सुजित दुबे अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. तीन वर्षाचा रुद्र आणि दीड वर्षाचा शिवम घराजवळ खेळत होते. रात्रीच्या सुमारास तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने घराजवळील नाल्याला पूर आला होता.
रुद्र आणि शिवम दोघेही खेळता खेळता नाल्याजवळ गेले. यावेळी दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.