महाकुंभमध्ये आता गोल्डन बाबांची चर्चा सुरू झाली आहे. एसके नारायण गिरी महाराज असे त्यांचे नाव असून ते 67 वर्षांचे आहेत. ते मूळचे केरळचे आहेत. ते सध्या दिल्लीत राहत आहेत. ते निरंजनी आखाडय़ाशी निगडित असून त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि सोन्याने सजवलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे ते कुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरले आहे. गोल्डन बाबा यांनी आखाडय़ाचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आणि निरंजनी आखाडय़ात सामील झाले. बाबा शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. धर्म आणि शिक्षण या दोन्हींची सांगड घालून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे. महाकुंभमेळ्यात आलेल्या भक्तांसाठी गोल्डन बाबा हे अध्यात्म आणि भक्तीचा संदेश देतात. सोने त्यांच्या साधनेशी जोडलेले आहे आणि दागिन्यांच्या प्रत्येक तुकडय़ात आध्यात्मिक शक्ती आहे, असे त्यांचे म्हणने आहे.
गोल्डन बाबा यांच्या अंगावर तब्बल चार किलो सोने आहे. याची बाजारात किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे. बाबांकडे सोन्याचे सहा लॉकेट असून, त्यापासून सुमारे 20 सोन्याच्या माळा तयार करता येतील. त्यांचा मोबाईल सोन्याने मढलेला आहे. बाबाच्या प्रत्येक दागिन्यांच्या तुकडय़ाला एक चमक आहे. त्यांच्या हातात सोन्याच्या अंगठय़ा, बांगडय़ा, घडय़ाळे इतकेच नाही तर सोन्याची काठीही आहे.