महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून सोने तस्करीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून त्यात तीन जण हे विमानतळावरील कर्मचारी आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे.
सोने तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीनंतर त्या टोळीची माहिती काढली. शोधमोहिमेदरम्यान तीन जण परदेशातून आणलेले सोने विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा डीआरआयच्या अधिकाऱयाने त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोने घेण्यासाठी आलेल्या तीन रिसिव्हर्सनादेखील ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साहित्य जप्त केले. आठ पाऊचमध्ये 24 अंडाकृती आकाराचे गोळे सापडले. त्यात सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये आहे. अटक केलेल्यांमध्ये तीन विमानतळावरील कर्मचारी आहेत. सोने विमानतळावर आणून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यासाठी त्याना कमिशन मिळत होते. या टोळीने परदेशातून आणलेले सोने काही रिसिव्हर्सना दिले होते. त्या सहाजणांचा जबाब नोंदवून त्यांना अटक केली.