
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आले. कोर्टात उभे केल्यानंतर रान्याला अश्रू अनावर झाले. सोन्याची तस्करी केल्याचा आता रान्याला पश्चाताप होत आहे. रान्याने कोर्टात आपल्या वकिलांशी बोलताना म्हटले की, मी विचार करतेय की मी यात कशाला पडले आहे. मला आता रात्रभर झोप येत नाही. मला मानसिक त्रास होत आहे. चौकशी वेळीही ती अनेकदा रडत होती. पोलिसांना उत्तरे देताना तिची दमछाक होत होती.
रान्याला 3 मार्चला बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. रान्या राव हिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 4.73 कोटी इतकी आहे. रान्या राव हिला 14 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रान्या राव ही डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस (हाऊसिंग) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या अमिरातीच्या विमानाने दुबईहून बंगळुरुला परतली होती. ती दर पंधरा दिवसांनी दुबईला जात असायची. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला होता.