सोने झाले लाखमोलाचे! सोन्याच्या पंढरीत गाठला लाखमोलाचा टप्पा; सोन्याचे दर उच्च्यांकी पातळीवर

सुवर्णनगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोमवारी सोन्याने लाखाचा उंबरा ओलांडला! तोळाभर सोन्याचा भाव 99,500 रुपयांवर गेला. जीएसटी आणि घडणावळ मिळून तोळ्याचा भाव लाखाच्या वर गेला आहे. सोन्याने लाखाची मजल ओलांडली असली तरी बाजाराला मात्र ग्राहकांची वाट बघावी लागत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेला जळगाव जिल्हा संपूर्ण देशात प्रसिद्ध असून देशभरातून येथे ग्राहक खरेदीसाठी येत असतात. सणासुदीच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात, तर काहीजण गुंतवणुकीसाठी, काही जण सोने-चांदीचे दागिने आवड म्हणून खरेदी करतात.

विशेष म्हणजे सध्या लग्नसराई व सणासुदीचे दिवस असतानाही बाजारात शुकशुकाट होता. सोमवारी सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा पार करताच बाजारातून ग्राहक गायबच झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या ‘टॅरिफ वॉर’मुळे जागतिक भांडवली बाजारात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. परिणामी सोन्याच्या दराने सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. सोमवारी बाजारात एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 99,500 रुपयांवर पोहोचला. जीएसटी आणि घडणावळ मिळून हा भाव लाखाच्या वर गेला. सोने खरेदीपेक्षा सोने मोड करण्यावर ग्राहकांचा भर आहे. त्यामुळे बाजारात खरेदी मंदावली असून रोखीचा व्यवहार वाढल्याचे दिसून येत आहे.

जगासह देशात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. डोनाल़्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला होता. त्यामुळे जगभरात अस्थिरता वाढत असून गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वळला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता सोने एक लाखाच्या टप्प्यात पोहचले आहे. सोन्याचे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोन्याने लाखामोलाचा टप्पा गाठला आहे.