हिंदुस्थानला ‘सोन्याचे’ दिवस! दागिने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले

सध्या हिंदुस्थानला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. कारण जनतेला कर्जाचा विळखा बसला असून सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 87 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘मोदी है तो सब कुछ मुमकीन है’ अशीच स्थिती देशात निर्माण झाली आहे. गगनाला भिडलेली महागाई, तुटपुंजा पगार, बेरोजगारी यांमुळे आर्थिक गरजांपोटी सोने तारण कर्जाची मागणी प्रचंड वाढली असून फेब्रुवारी 2025मध्ये दागिन्यांच्या बदल्यात कर्ज घेणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे उघड झाले आहे.

21 फेब्रुवारी 2025पर्यंत बँकांकडून वितरण झालेल्या सोने तारण कर्जात 87.4 टक्क्यांची वाढ झाली असून हे कर्ज तब्बल 1.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत हा आकडा प्रचंड मोठा असल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

आणीबाणीसारखी स्थिती

23 फेब्रुवारी 2024मध्ये हाच आकडा 1.02 लाख कोटी रुपये होता. म्हणजेच सोने तारण कर्जाचे प्रमाण केवळ 15.2 टक्के होते. त्या तुलनेत वैयक्तिक कर्जात एकूण 19 टक्क्यांची वाढ दिसली. मात्र सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे समोर आले. महागाईच्या तुलनेत पगार नाही, बेरोजगारीमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत अचानक पैशांची गरज लागली की सोने तारण ठेवून रोख रक्कम मिळवण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे उघड झाले आहे.

सोन्याच्या किमती वेगाने वाढत असल्याने सोने तारण ठेवून कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक गरज वाढल्यामुळे सोने तारण ठेवण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे असुरक्षित वैयक्तिक कर्जाची मागणी घटल्याचे अर्थतज्ञांनी म्हटले आहे.

मंगळसूत्र गहाण ठेवायला लावल्यानंतरच हे शांत बसतील! काँग्रेसचा सणसणीत टोला

महागाई, बेरोजगारीमुळे जनतेला सोने तारण ठेवून कर्जबाजारी होण्यास मोदी सरकारने भाग पाडले आहे. हळूहळू सर्व दागिने गहाण ठेवल्यानंतर आता गृहलक्ष्मीला मंगळसूत्र गहाण ठेवायला लावूनच भाजप सरकार शांत बसेल, भाजपच्या सत्ताकाळात हे सर्व शक्य आहे, असा सणसणीत टोला काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी एक्सवरून लगावला आहे.