नातेवाईकाच्या घरी दागिने चोरी करून घेतलं गोल्ड लोन, पोलिसांनी केली अटक

शिमला येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील पोलिसांनी दागिने चोरीच्या प्रकरणात हरियाणातील एका तरुणीला अटक केली आहे. तरुणी शिमला येथील तिच्या नातेवाईकाच्या घरी राहत होती आणि त्यादरम्यान तिने दागिने पळवून नेले. त्यानंतर त्या दागिन्यांवर तिने गोल्ड लोन घेतले. आरोपी तरुणीने खरोखरच गोल्ड लोन घेतले आहे की नाही याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सोनिया असे चोरी करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट 2024 मधील असून शिमला येथील पडेची गावातील रहिवासी कुसुम लता यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, 11 ऑगस्ट 2024 रोजी सोनिया ने कुसुम लता यांना फोन करून ती नोकरीसाठी शिमला येथे येत असल्याचे सांगितेल आणि काही दिवस तिच्या घरी राहाण्याबाबतही सांगितले. नात्यातच असल्यामुळे कुसुम लता यांनी त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली. सोनिया 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी आली आणि 14 ऑगस्टपर्यंत तिथेच राहिली. यानंतर ती हरियाणातील सोनीपत येथे परत आपल्या घरी निघून गेली. मात्र, ती गेल्यानंतर कुसुम यांनी दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी कपाट उघडले तेव्हा त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब होते. त्यामुळे संशयाची सुई साोनियाकडेच होती. कुसुम लता यांनी सोनियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती उत्तर देत नव्हती. त्यामुळे संशय आणखी वाढला.

यानंतर कुसुम लता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, तरुणीला अटक करण्यासाठी हरयाणामधील सोनीपत येथे एक पथक पाठवण्यात आले. तेथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि शिमला येथे आणले. चौकशीदरम्यान तरुणीने चोरी केलेल्या दागिन्यांवर गोल्ड लोन घेतल्याचे सांगितले. पोलीस तपास करत असून दागिने परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.  पोलिस ठाण्याचे एसएचओ धर्मसेन नेगी म्हणाले की, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपी महिलेची चौकशी सुरू आहे आणि लवकरच दागिन्यांचे काय झाले हे स्पष्ट होईल.