पितळेच्या दागिन्यांवर 22 कॅरेटचा हॉलमार्क, जयपूर-जोधपूरमध्ये बनावट सोन्याचा धंदा उघडकीस

सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोने प्रतितोळा 90 हजारांच्या पुढे गेले असून लवकरच एक लाखाचा टप्पा ओलांडणार असल्याची चर्चा असताना जयपूर आणि जोधपूरमध्ये पितळेच्या दागिन्यांना 22 कॅरेटचा हॉलमार्क लावला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थानातील प्रमुख शहरांमध्ये बनावट हॉलमार्क लावून तांबे-पितळेचे दागिने 22 कॅरेट शुद्ध सोने म्हणून विकले जात आहेत. हे काम बनावट हॉलमार्क लावणाऱ्या अनेक केंद्रांकडून केले जात आहे. त्यामुळे शेकडो लोकांची फसवणूक होत आहे. एका साखळीचे वजन जर 15.5 मिलीग्रॅम असेल आणि त्यावर 5 कॅरेट सोन्याचा थर बसवल्यास त्याची किंमत 29 हजार रुपये होते, परंतु जर याच वस्तूला बनावट 22 कॅरेटचा हॉलमार्क लावला तर त्याची शुद्ध सोने म्हणून किंमत तब्बल 1 लाख 25 हजार इतकी होते. कानातले जर 1.89 मिलीग्रॅम असेल आणि त्याला 5 कॅरेट सोन्याचा थर लावला तर त्याची किंमत 2 हजार इतकी होते, परंतु याच वस्तूला बनावट 22 कॅरेटचा हॉलमार्क लावून विकल्यास याची किंमत 17 हजार होते. दागिने शुद्ध 22 कॅरेट सोन्याचे असतात, पण ज्वेलर्स कर वाचविण्यासाठी बनावट हॉलमार्क कार्ड बनवतात. हॉलमार्क सेंटरचे नाव मूळ प्रमाणपत्राप्रमाणेच लिहिलेले आहे. प्रमाणपत्र क्रमांक, ग्राहकाचे किंवा ज्वेलर्सचे नाव, दागिन्यांचे तपशील, सोन्याची शुद्धता व दागिन्यांचा फोटो जोडलेला आहे. एचयूआयडी क्रमांक नाही अशा हॉलमार्क कार्डांवर बंदी आहे.

हॉलमार्कनंतर किंमत चारपट

बनावट सोन्यावर हॉलमार्क लावताच त्याची किंमत अनेक पटींनी वाढते. हॉलमार्क हा वस्तू 22 कॅरेटच्या खऱ्या सोन्यापासून बनलेली असल्याचा खात्रीलायक पुरावा मानला जातो, परंतु जयपूर-जोधपूरमधील ज्या दोन केंद्रांवर बनावट दागिन्यांवर हॉलमार्क लावण्यात आला होता, तिथे त्याची प्रत्यक्ष किंमत चार पटीने वाढली होती.

एचयूआयडी आणि हॉलमार्क कार्डही बनावट

जोधपूरमधील हॉलमार्किंग सेंटरने पेंडंटवर हॉलमार्किंग केल्यानंतर प्रमाणपत्र दिले होते. चौकशीत ते बनावट असल्याचे आढळून आले. जयपूरमधील आरआर हॉलमार्क सेंटरने दागिन्यांवर लावलेला हॉलमार्कही बनावट होता. खऱ्या हॉलमार्कमध्ये भारतीय मानक ब्युरोचे चिन्ह आणि 6 अंकी एचयूआयडी क्रमांक असतो. केंद्राने लावलेले हॉलमार्क प्रतिबंधित आहेत.

असे ओळखा खरे सोने

दागिन्यांच्या वस्तूंवर लेझरने 6 अंकी हॉलमार्क कोड छापला जातो. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) चा लोगो आहे. सोन्याच्या कॅरेटची संख्या, हॉलमार्क सेंटरचा कोड आणि दागिन्यांचा ओळख क्रमांक लिहिलेला असतो. 22 कॅरेट सोने म्हणजे दागिन्यांमध्ये 97.6 टक्के शुद्ध सोने आहे. 18 कॅरेट सोने म्हणजे दागिन्यांमध्ये 75 टक्के शुद्ध सोने आहे, तर 14 कॅरेट सोने म्हणजे दागिन्यांमध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने आहे.