सोन्याला झळाळी, भाव गगनाला भिडले; ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच गुंतणूकदार धास्तावले

काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक घडामोडी किंवा शेअर बाजाराच्या सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याने क्वचित सोन्याच्या किंमतीत घटही झाली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दराचा आलेख चढाच आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे गुतंवणूकदार धास्तावल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ट्रम्प यांनी सत्ता स्वीकारताच गुरुवारी ( दि. 23 जानेवारी रोजी) सोने आतापर्यंतच्या उच्चांकावर होते. या दिवशी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 82,900 रुपयांपर्यंत पोहचला होता. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 82,580 रुपये आहे. सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता वाढली आहे.तसेच अनेक गुतंवणूकदार ट्रम्प यांच्या धोरणांमुळे धास्तावले आहे. त्यामुळे शेअर मार्केट आणि फेडरल बँकेत गुंतवणूक करण्याएवजी सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी सत्ता स्वाकारताच सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर सोन्याचे दर 81,273 रुपये प्रति दहा ग्रॅमवरून 82,900 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

ट्रम्प प्रशासनाच्या शुल्क आणि निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आणि तणाव वाढला आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडावर कर लादण्याचा निर्णय आणि इतर व्यापार धोरणांमुळे गुंतवणूकदार ‘सेफ इनवेस्टमेंट’ म्हणजेच सोन्या-चांदीकडे आकर्षित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरण बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्यात आल्यास बाँड उत्पन्न आणि डॉलर निर्देशांकात घट होऊ शकते. या घटकांमुळे सोन्याची मागणी आणि किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.