Gujrat शेअर मार्केट ट्रेडरच्या फ्लॅटमधून 95.5 किलो सोने, 70 लाख रुपयाची रोख रक्कम जप्त; ATS आणि DRI ची कारवाई

गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) यांनी सोमवारी संध्याकाळी अहमदाबादच्या पलाडी भागातील एका निवासी फ्लॅटमधून 95 किलोपेक्षा जास्त सोने आणि अंदाजे 70 लाख रुपये रोख जप्त केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

सध्याच्या दरानुसार, अधिकाऱ्यांना सापडलेल्या 99.5 किलो सोन्याच्या साठ्याची किंमत 87-88 कोटी रुपये असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डीआरआय तसेच एटीएसच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की बंद अपार्टमेंटमधून बिस्किट स्वरूपात सापडलेल्या एकूण सोन्यापैकी किमान 35 किलो सोने ‘परदेशातील’ होते. डीआरआयकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, अपार्टमेंटमध्ये साठवलेल्या सोन्याच्या आणि रोख रकमेची अधिकृत माहिती एटीएसने दिली असली तरी, यंत्रणांना अद्याप हे निश्चित समजलेले नाही की अपार्टमेंटमध्ये सापडलेले सर्व सोने आणि रोख रक्कम गुन्ह्यातून मिळालेली आहे की नाही. सूत्रांच्या माहिती नुसार, अविष्कार अपार्टमेंटमधील फ्लॅट अहमदाबादमधील एका शेअर बाजार व्यापाऱ्याला भाड्याने देण्यात आला होता.

डीआरआयच्या सूत्रांनी सांगितलं की, या प्रकरणात संशयिताची अद्याप चौकशी झालेली नाही. शिवाय, डीआरआय हे देखील तपासेल की परदेशी मूळचे सोने कायदेशीररित्या आयात केले गेले होते की देशात तस्करी केली गेली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.