
अमेरिकेने विविध देशांवर लादलेले शुल्क आणि रशिया-युक्रेन युद्धावरील अनिश्चिततेमुळे बाजारपेठेवर फार मोठे परिणाम झाले आहेत. याचा थेट परिणाम प्रामुख्याने सोने आणि चांदीवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सोन्याच्या किमतीत चांगलीच घसरण झाली आहे तर, चांदीच्या किमतीत अवघ्या दोन दिवसांत घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चांदीच्या दरात 5,500 रुपयांपेक्षा जास्त घट झालेली आहे.
चांदीचा भाव स्पॉटवर 91,600 रुपये आणि तो सध्या 88,200 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, सोन्याच्या किमतीतही 2000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सध्याच्या घडीला सोन्याची किंमत ही 88, 50 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. अमेरिकेने 2 एप्रिलपासून सर्व देशांवर शुल्क लादले आहे, त्यामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. शेअर बाजारातील घसरणीसोबतच चांदी आणि सोन्याच्या किमतीही चांगल्याच घसरल्या आहेत.
बाजारात घबराटीचे वातावरण
अमेरिकेच्या शुल्कामुळे जागतिक बाजारात घबराट पसरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सट्टा बाजार तापला होता, त्यामुळे किमती घसरल्या. सोने चांदी खरेदीसाठी सध्या खरेदीदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सराफा बाजारही ठप्प झालेला दिसून येत आहे. आगामी लग्नाच्या सीझनपूर्वी सोने चांदीमध्ये झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचे दर हे ग्राहकांच्या पथ्यावर पडणारे दर आहेत.
7 एप्रिल 2025 रोजी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोने आणि चांदीचे दर हे असे आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर 83,000 रुपये, 24 कॅरेटचा भाव 90,530 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 67,910 रुपये इतका आहे.