
शीव आणि दादरच्या टिळक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे पूर्ण मुंबईच्या वाहतूककोंडीचे बारा वाजले असताना पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रखडलेल्या दोन पुलांचे बांधकाम पूर्ण करून वाहतुकीला खुले केले जाणार आहेत. अंधेरीचा गोखले पूल 15 मे आणि विक्रोळी पूल 31 मेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरवासीयांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मस्जिद बंदर स्थानकाजवळील कर्नाक बंदरचा पूलही जूनपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने केला आहे. त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर हा पूलही जून महिन्यापासून वाहतुकीला सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य पूल अभियंते उत्तम श्रोते यांनी दिली.
मुंबईतील विविध ठिकाणी रखडलेले पूल, रस्ते आणि नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. महापालिकेच्या पूल खात्याकडून गोपाळकृष्ण गोखले पूल, शीव (सायन) पूल, बेलासिस पूल, कर्नाक पूल, विद्याविहार पूल आणि विक्रोळी पूल या पुलांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी रखडलेल्या गोखले आणि विक्रोळी पुलाची कामे वेगाने सुरू आहेत.
विक्रोळी पुलाच्या पश्चिम भागाचे काम शिल्लक
पूर्व आणि पश्चिम विक्रोळीला जोडणाऱ्या विक्रोळी पुलाचे पूर्व भागाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र पश्चिमेकडील पुलाच्या भागावर दोन स्टॅण्ड गर्डर बसवण्यात आले असून एक गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. 20 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर स्लॅब आणि डांबरीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे.
गोखले पुलाचे स्लॅब मेपर्यंत पूर्ण होणार
अंधेरीच्या गोखले पुलाच्या पालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर स्लॅब, डांबरीकरण आणि इतर कामे राहिली आहेत. ही पूर्ण झाली की 15 मे किंवा त्याच्या आधी गोखले पूल वाहतुकीसाठी सुरू होईल.
कर्नाकला तांत्रिक अडचणींचा वेढा
कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली 550 मेट्रिक टन वजनी उत्तर बाजूचा गर्डर रेल्वे भागात सरकवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता आरई वॉल बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात.