भूलतज्ञाची ओळख आता सर्वसामान्य माणसाला पटू लागली आहे, विशेषतः ज्यांची सर्जरी झाली त्यांना. कपड्याच्या दुकानातला माझा रोजचा दुकानदार, एरवी डॉक्टर म्हणून थोडीशी ओळख दाखवायचा. त्याची सर्जरी झाल्यावर मात्र तो दरवेळी अदबीने समोर येतो, ‘‘पैसी है मॅडम’’ असे म्हणून दोन-तीन वाक्यांचा आवर्जून संवाद साधतो.
बिल्डिंगमधल्या एका गृहस्थाची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. माझी ‘हाय-हॅलो’चीसुद्धा ओळख नाही. तरी जॉगिंग ट्रकवर सहपत्नी चालताना मला थांबवून निक्षून म्हणाले, ‘‘मॅडम शस्त्रक्रियेच्या वेळी सर्व तुमच्या हातात असतं.’’ पत्नीला म्हणाले, ‘‘पडद्यामागचे देव म्हणजे अॅन्सथिशीयॉलॉजिस्ट’’ असे म्हणत कोपऱ्यापासून चक्क नमस्कार ठोकला.
अगदी देवाच्या उपमेची अपेक्षा नसली तरी जेव्हा एखाद्या कठीण शस्त्रक्रियेचा उल्लेख वर्तमानपत्रात होतो, तेव्हा भूलतज्ञाचा साधा उल्लेख तरी व्हावा अशी इच्छा प्रत्येक भूलतज्ञाची. कारण भूल देऊन ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला सुखरूप ठेवण्याची तारेवरची कसरत भूलतज्ञ करत असतो.
सर्जरीच्या दरम्यान सर्जन शस्त्रक्रिया करण्यात दंग असतो, पण भूलतज्ञ दर मिनिटाला रुग्णाची नाडी किती आहे, ब्लडप्रेशर कसे आहे, ऑक्सिजन लेवल किती आहे, रुग्ण श्वास बरोबर घेत आहे ना, श्वासाची गती किती आहे, हृदयाची गती व ई.सी.जी. वरचे चित्र ठीक आहे ना, शुगर किती आहे, युरिन किती आहे, रक्त चढवावे लागेल का या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असतो. थोडक्यात रुग्णाचा जीव भूलतज्ञाच्या हातात असतो, असे भूलतज्ञ डॉ. शिल्पा तिवसकर यांनी सांगितले.