मोदी सरकारच्या काळात गोव्यातील पर्यटन घटत चालल्याचे समोर आले असून परदेशी पर्यटकांचा श्रीलंकेकडे अधिक ओढा असल्याचे समोर आले आहे. गोवा पर्यटन उद्योगाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये राज्यात 85 लाख परदेशी पर्यटक आले होते, तर 2023 मध्ये केवळ 15 लाख पर्यटक आले. टॅक्सी माफियांकडून होणारी पिळवणूक आणि भरमसाट दरवाढ हा मोठा जाच सुरू आहे. टॅक्सीचालकांकडून त्रास आणि जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. सोशल मीडियावरही गोव्याविरोधातच ट्रेंड सुरू असल्याचे चित्र आहे.
केंद्रीय माहिती आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यातील परदेशी पर्यटन कोविडपूर्व पातळी गाठण्यात अपयशी ठरले आहे. अभ्यागतांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे अहवालात म्हटले आहे. रशिया आणि युनायटेड किंग्डमसारख्या देशांतील पर्यटक गोव्यापेक्षा श्रीलंकेसारख्या ठिकाणांना अधिक पसंती देत असल्याने गोव्यामध्ये पर्यटनात मोठी घट झाल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. दरम्यान, देशांतर्गत पर्यटनात मात्र वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.