गोवा येथून इंदूर (मध्य प्रदेश) येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या अवैध दारूचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरणगाव (ता. नगर) शिवारात दळवीवस्तीजवळ पकडला. 66 लाख 24 हजार रुपये किमतीची दारू, 36 हजारांचा ट्रक असा एक कोटी दोन लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकमधील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, एकूण सातजणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकमालक दीपक आदिकराव पाटील (रा. शिराळा, ता. सांगली), चालक शहाजी लक्ष्मण पवार (रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), शैलेश जयवंत जाधव (रा. ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली), हेमंत शहा (रा. इंदूर, मध्य प्रदेश; सध्या रा. मडगाव, गोवा), सायमन ऊर्फ मायकल (पूर्ण नाव माहीत नाही), जमीर मुलाणी (रा. मलकापूर मार्केटजवळ, ता. कराड, जि. सातारा) व सुखदेवसिंग गिल ऊर्फ कवलजितसिंग भुल्लर ऊर्फ लबीशेठ (रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करीत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथून हेमंत शहा, सायमन ऊर्फ मायकल व जमीर मुलाणी हे लबीशेठ याच्याकरिता त्यांच्या हस्तकामार्फत (गोवा) मडगावमधून आणलेल्या विदेशी दारूवर ‘फॉर सेल इन मध्य प्रदेश ओन्ली’ असे लेबल बदलून ट्रकमधून दौंड, अहिल्यानगर ते शिर्डीमार्गे मध्य प्रदेशकडे जाणार असल्याचे समजले. माहिती मिळताच निरीक्षक आहेर यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, शरद बुधवंत, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने अरणगाव शिवारात बायपास रस्त्यावर दळवीवस्तीजवळ सापळा रचून संयशित ट्रक ताब्यात घेतला.
ट्रकमधील तिघांकडे विदेशी दारूबाबत विचारणा केली असता, ही दारू हेमंत शहा, सायमन ऊर्फ मायकल, जमीर मुलाणी यांच्या मालकीची असून, ती सुखदेवसिंग गिल ऊर्फ लबीशेठ याला देण्यासाठी मध्य प्रदेश येथे घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली.