
पाकिस्तानात नाही तर आखाती देशात जा, पण भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने निर्वासिताला खडसावले.
खालेद हुसेन असे या निर्वासिताचे नाव आहे. ते येमेन देशाचे नागरिक आहेत. खालेद हुसेन हे कुटुंबासह गेली दहा वर्षे पुण्यात राहत आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस दिली आहे. याविरोधात हुसेन यांनी ही याचिका केली आहे. ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. तेथील व्हिसासाठी प्रक्रिया सुरू आहे. तोपर्यंत मला भारतात राहू द्या, अशी विनंती हुसेन यांनी न्यायालयाकडे केली. याला विशेष सरकारी वकील संदेश पाटील यांनी विरोध केला. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने संताप व्यक्त केला.