तापमानवाढीचे अवघ्या जगासमोर आव्हान

अवघे जग हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात आहे. राज्यात फेब्रुवारीतच कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. जागतिक स्तरावर तापमानात सरासरी 1.65 सेल्सियस वाढ झाली आहे. आतापासून योग्य पावले न उचलल्यास दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ आणि प्राणी-पक्ष्यांना धोका निर्माण होईल, अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली.

 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा झाला. या पार्श्वभूमीवर जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यावर जगात मोठय़ा प्रमाणात विचारमंथन होताना दिसतेय. विविध मानवी उलाढालींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक, इंधन यामुळे जगात 1.2 अंश सेल्सियस तापमान वाढले आहे. हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे. 19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड या एकटय़ा हरितगृह वायूचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 20 वर्षांत त्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जंगलतोड होतेय.

हिंदुस्थानात 125 वर्षांत फेब्रुवारी सर्वात उष्ण ठरला. हवामान बदलाचे अनपेक्षित परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे असे हवामान खाते, पुणे येथील माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.  हवामान बदलाचे अनेक परिणाम दिसून येतात. मुसळधार पाऊस, वादळ, सुपीक जमीन ओसाड होणे, उष्णतेची लाट असे बदल होऊ शकतात.

परिणाम काय

19 व्या शतकापासून जगभरातील तापमानात 1.2 अंश सेल्सियसची वाढ. u वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले. u  या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची भीती. u शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमानवाढीची मर्यादा ठरवली होती. 2024 मध्येच जगाचे सर्वसाधारण तापमान 1.65 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आले. ते आता 1.5 अंश सेल्सियसपर्यंत रोखणे गरजेचे आहे.